पत्रकारांवर हल्ला प्रकरणी त्र्यंबक नगरपरिषद अॅक्शन मोडवर; ठेकेदाराला ४८ तासांत खुलासा देण्याचे आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी त्र्यंबक नगरपरिषद सजग झाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पत्रकार व नागरिकांच्या प्रतिक्रियांनंतर नगरपरिषदेकडून वाहन प्रवेश फी वसुलीचे कंत्राट असलेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ठेकेदाराला ४८ तासांच्या आत सविस्तर खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अन्यथा कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी (दि. २० सप्टेंबर) साधू-संतांच्या बैठकीचे वार्तांकन करताना ‘पुढारी’चे किरण ताजणे, ‘झी २४ तास’चे येमेश खरे आणि ‘साम टीव्ही’चे अभिजित सोनवणे या पत्रकारांवर प्रवेश फी वसुलीच्या दरम्यान चार-पाच जणांनी रस्त्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. प्रकरणी तातडीने कारवाई करत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रशांत राजू सोनवणे, शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे या तिघांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहन प्रवेश फी वसुलीचे काम ‘ए.एस. मल्टी सर्व्हिसेस, खारघर – नवी मुंबई’ या कंपनीकडे असून, ठेकेदार अनिल शुक्ला यांच्या देखरेखीखाली हे काम चालते. वसुलीसाठी नेमलेल्या बाहेरच्या तरुणांनीच पत्रकारांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, ठेकेदाराने करारातील अट क्रमांक ३, ५ आणि ८ चा भंग केला असून, घटनास्थळी दरफलक न लावणे ही गंभीर बाब आहे. “४८ तासांच्या आत सविस्तर खुलासा द्यावा, अन्यथा ठेका रद्द करण्यात येईल,” असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. पत्रकारांवरील हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, नगर परिषदेच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.