प्रेयसीच्या खर्चाला वैतागून तरुणाची आत्महत्या; आठ महिन्यांनंतर प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल 

Spread the love

प्रेयसीच्या खर्चाला वैतागून तरुणाची आत्महत्या; आठ महिन्यांनंतर प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : प्रेयसीकडून सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तब्बल आठ महिन्यांच्या तपासानंतर शिवाजी नगर पोलिसांनी प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुण आतिक (नाव बदलले आहे, वय २२) गोवंडीतील बैंगणवाडी भागात आई-वडील व बहिणीसोबत राहत होता. बेलापूर येथील एका खाजगी कंपनीत तो कार्यरत होता. पगार बोनससह जवळपास ३० हजार रुपयांपर्यंत मिळत असे. सुरुवातीला घरखर्चाला मदत करणारा आतिक नंतर पैसे देणे थांबवू लागला. कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर तो मित्राला पैसे देतो अशी थाप मारत असे.

१० जानेवारी २०२५ रोजी त्याने आईकडून डेबिट कार्ड घेऊन २५ हजार रुपये काढले आणि रात्री आपल्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. आतिकच्या मृत्यूनंतर त्याची बहीण परवीनने त्याचे इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यातून त्याचे शबनम (वय २१) नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. संभाषणातून शबनम सतत आतिककडे पैशांची मागणी करून दबाव आणत असल्याचे स्पष्ट झाले.

जून ते डिसेंबर २०२४ या काळात शबनमने आतिककडून महागड्या भेटवस्तू व रोख रक्कम घेतली होती. सोनसाखळी देण्यासाठी आतिकने आपला आयफोन विकून ४० हजार रुपये जमवले. इतकेच नव्हे तर सोनसाखळी खरेदीसाठी त्याने तब्बल तीन लाख रुपये दिले. शबनमच्या आजारपणात रुग्णालयाचे ५० हजार रुपयांचे बिलदेखील आतिकनेच भरले होते. आरोपानुसार, शबनम त्याच्यावर घर सोडण्याचा आणि कुटुंबीयांशी संबंध तोडण्याचा दबाव आणत होती. या छळाला कंटाळूनच आतिकने आत्महत्या केल्याचा आरोप त्याची आईने फिर्यादीत केला आहे.

शिवाजी नगर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी शबनम शेख (वय २१) हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रेमसंबंधातील आर्थिक शोषण आणि मानसिक तणावामुळे होणाऱ्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon