अदाणी ग्रुपकडून दोन पत्रकारांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला; दोघांना कोर्टाने बजावली नोटीस

Spread the love

अदाणी ग्रुपकडून दोन पत्रकारांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला; दोघांना कोर्टाने बजावली नोटीस

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – प्रसिद्ध उद्योग समूह अदाणी ग्रुपने पत्रकार अभिसार शर्मा आणि ब्लॉगर राजू परुळेकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. सदर प्रकरणात गांधीनगर येथील दंडाधिकारी न्यायालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे. २० सप्टेंबर रोजी या दोघांना आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. अदाणी ग्रुपने आरोप केला आहे की, या दोघांनी हेतुपुरस्सर खोटी आणि बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध, प्रसारित करून कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. अदाणी ग्रुपचे वकील संजय ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर दंडाधिकारी न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २२३ नुसार ही नोटीस धाडली आहे. यानुसार, आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, शर्मा आणि परुळेकर यांना २० सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे. अभिसार शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर आणि राजू परुळेकर यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर अदाणी समुहाची प्रतिमा डागाळेल, बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे.

अदाणी ग्रुपने भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६ (१, २, आणि ३) नुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत, शर्मा यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी आसाममध्ये समुहाला मिळालेल्या जमिनींवरून काही विधाने केली होती. तर, परुळेकर यांनी जानेवारी २०२५ पासून अदाणी समुहाची बदनामी होईल असा मजकूर ट्विट् करत प्रसिद्ध केला होता असा आरोप आहे. या दोन पत्रकारांनी १२ ऑगस्ट २०२५ च्या गुवाहाटी उच्च न्यायालयाचा आदेशाबद्दल आणि अदाणी ग्रुपबद्दल काही विधाने केली होती. अदाणी ग्रुपने, या दोघांनी केलेले आरोप निराधार आणि खोडसाळ असल्याचे म्हटले होते. अदाणी समुहाने म्हटले आहे की, या पत्रकारांनी ज्या आदेशाबद्दल म्हटलेले आहे त्याचा समुहाशी काहीही संबंध नाही.या प्रकरणातील ‘महाबळ सिमेंट प्रा. लि.’ या कंपनीचा अदाणी ग्रुपशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. कोर्टात पुरावे म्हणून शर्मा यांचा व्हिडिओ, परुळेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचा आदेश सादर करण्यात आला आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर दोघांनाही २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon