नौदलाचा जवान अचानक रहस्यमयरित्या गायब, शेवटचं लोकेशन भिवपुरीच्या जंगलात; जंगलात सापडला मृतदेह
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलाब्यातील डॉकयार्ड येथे कार्यरत असलेला नौदलातील सुरजसिंह चौहान हा जवान अचानक गायब झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार ७ सप्टेंबरपासून हा जवान बेपत्ता होता. पोलीसांचे पथक सुरज यांचा शोध घेत असताना त्यांना जंगलात एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे असा प्रश्न पोलीसांना सुरुवातीला पडला होता. मात्र आता सत्य समोर आले आहे. सुरजसिंह चौहान यांची २९ मे रोजी कुलाबा येथील डॉकयार्ड येथे नेमणूक झाली होती. ते ७ सप्टेंबरपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. सुरज हे सात सप्टेंबरला पहाटे पाट वाजचा घरातून बाहेर पडले होते. मात्र काही वेळानंतर त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात सुरज यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
यानंतर पोलीसांनी या जवानाचा शोध सुरु केला होता. सर्वप्रथम सूरज यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन शोधण्यात आले. हे लास्ट लोकेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवपूरी रोड स्टेशन परिसरातील होते. पोलीसांची टीम या ठिकाणी सूरज यांचा शोध घेण्यासाठी पोहोचली होती. पोलीसांच्या पथकाने लास्ट लोकेशन असलेला परिसर पिंजून काढला. मात्र सुरुवातीला हाती काहीच लागले नाही. मात्र पोलीसांना हळूहळू काही पुरावे मिळाले. थोड्या वेळाने पोलीसांना जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. माथेरानच्या खालच्या पाली भूतवली धरणाजवळील जंगलात हा मृतदेह होता. पोलीसांनी मोठ्या शिताफीने हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच हा मृतदेह सुरज सिंह चौहान यांचा असल्याची माहिती पोलीस आणि रेस्क्यू टीमने दिली आहे. आता पोलीसांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. सुरज यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सुरज हे मुळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. ते ३३ वर्षांचे आहेत. त्यांच्या मृ्त्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सुरज यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाता तपास कण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे.