डोंबिवलीचा आर्यन खेडेकरचा भागीरथी विजय; १४ वर्षीय बालकाने ८१ किमी नदी १२ तासांत पार करत रचला विक्रम

Spread the love

डोंबिवलीचा आर्यन खेडेकरचा भागीरथी विजय; १४ वर्षीय बालकाने ८१ किमी नदी १२ तासांत पार करत रचला विक्रम

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली – डोंबिवलीतील १४ वर्षीय जलतरणपटू आर्यन खेडेकरने अवघ्या १२ तासांत भागीरथी नदीतील तब्बल ८१ किलोमीटरचे अंतर पार करत विक्रम रचला आहे. एवढ्या कमी वयात इतक्या आव्हानात्मक परिस्थितीत धाडसाने पोहत नदी पार करणाऱ्या आर्यनच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आर्यन खेडेकर, डोंबिवली एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतो. तो रूपाली रेपाळे जलतरण अकॅडमीचा विद्यार्थी आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आयोजित ७९व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आर्यनने भाग घेतला. ही जगप्रसिद्ध खुल्या गटातील स्पर्धा होती. अकॅडमीच्या संचालिका व ज्येष्ठ जलतरणपटू रूपाली रेपाळे यांनी आर्यनला कठोर प्रशिक्षण दिलं होतं. भागीरथी नदीचा वेगवान प्रवाह, नदीतील नैसर्गिक आव्हाने, मलबा, वाढता प्रवाह यांचा अभ्यास करून त्यांनी आर्यनला सक्षमपणे तयार केले. सातत्यपूर्ण सरावानंतर आर्यन या स्पर्धेसाठी सज्ज झाला.

आई-वडील आणि प्रशिक्षकांचा आधार, तसेच सहकाऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे आर्यन आत्मविश्वासाने नदीत उतरला. शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने पारंपरिक पद्धतीने ग्रीस लावले होते. रात्रीच्या वेळी त्याने नदीत सूर मारली आणि अखंड प्रयत्न सुरू ठेवले. प्रवासात त्याला प्रखर सूर्यकिरणांचा त्रास, अचानक समोर येणारा मलबा, वाढता पाण्याचा वेग अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही परमेश्वराचे नाव घेत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन निर्धाराने पुढे सरकत राहिला.

या स्पर्धेदरम्यान नदीच्या काठावर जमलेल्या नागरिकांनी झेंडे दाखवत, जल्लोषाने आर्यनला सतत प्रोत्साहित केले. शेवटी अखेरच्या टप्प्यात काठावर पोहोचताच उपस्थितांनी त्याला खांद्यावर उचलून विजयोत्सव साजरा केला. फक्त १४ व्या वर्षी इतका मोठा पराक्रम करून आर्यन खेडेकरने डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्याच्या या विक्रमामुळे महाराष्ट्रातील जलतरण क्रीडेला नवी दिशा मिळाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon