लोखंडानंतर आता झुरळ! रामदेव हॉटेलच्या ग्राहकांचा संताप अनावर, कारवाईची मागणी तीव्र

Spread the love

लोखंडानंतर आता झुरळ! रामदेव हॉटेलच्या ग्राहकांचा संताप अनावर, कारवाईची मागणी तीव्र

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण – कल्याणमधील नामांकित रामदेव हॉटेल पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. शहरातील खवय्यांचे आकर्षण असलेले हे हॉटेल आता स्वच्छतेअभावी लोकांच्या रोषास सामोरे जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाच्या थाळीत लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी हॉटेलमधून पार्सल घेतलेल्या फ्राईड राईसमध्ये थेट झुरळ आढळल्याने संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई महापालिकेत उच्चपदावर कार्यरत असलेल्या निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी फ्राईड राईस ऑर्डर केला. पार्सल घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीने जेवण सुरू केले आणि त्याच क्षणी फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे, त्या आधीच त्यांच्या मुलांनी हा राईस खाल्ला होता. “मुलांना काही झाले तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल निकिता जाधव यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्राहकांचा विश्वास डळमळीत

कल्याणकर रामदेव हॉटेलवर मोठ्या विश्वासाने जेवणासाठी जातात, पण वारंवार घडणाऱ्या निष्काळजी प्रकारांमुळे ग्राहकांच्या पदरी आता फक्त निराशा पडत आहे. “प्रसिद्ध नाव असूनही जर अशा प्रकारे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असेल तर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी संतप्त ग्राहकांकडून होत आहे.

व्यवस्थापनाची उडवा-उडवी

याबाबत रामदेव हॉटेलच्या व्यवस्थापकांना विचारणा करण्यात आली असता, “थांबा, आम्ही नंतर बोलतो… काहीतरी नक्की करू,” अशी केवळ उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन या गंभीर प्रकरणाची जबाबदारी स्वीकारते आहे की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

ग्राहकांच्या नाराजीला उधाण आले असून, शहरातील आरोग्य विभाग आणि पालिकेने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon