डीजे बंदीसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती सरिता खानचंदानींची आत्महत्या; उबाठा जिल्हा प्रमुखासह पाच जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : डीजे बंदीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि वकिल सरिता खानचंदानी (वय ४५) यांनी स्वतःच्या राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, शिवानी फाळके, उल्हास फाळके, जिया गोपलानी आणि राज चांदवानी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
❖ सुसाईड नोटमध्ये केले गंभीर आरोप
घटनेच्या ठिकाणी सुसाईड नोट मिळाली असून, त्यात सरिता यांनी वरील पाच जणांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत. या सर्वांनी वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप सरितांनी आपल्या चिठ्ठीत केला आहे. पोलिसांनी या आधारावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
❖ समाजहितासाठी लढणारी कार्यकर्ती
सरिता खानचंदानी यांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात डीजे संस्कृतीविरोधात ठाम भूमिका घेतली होती. न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून त्यांनी डीजेवर बंदी आणण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य ठळकपणे चर्चेत आले होते.
❖ आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल
घटनेनंतर सरितांनी सातव्या मजल्यावरून उडी घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे या घटनेबाबत जनमानसात मोठी खळबळ उडाली आहे.
❖ पोलिसांचा तपास सुरू
विठ्ठलवाडी पोलिसांनी सांगितले की, “आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुसाईड नोट आणि नातेवाईकांचा जबाब यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” या घटनेनंतर उल्हासनगरसह संपूर्ण जिल्ह्यात दु:ख व संतापाचे वातावरण असून, सरिता खानचंदानी यांच्या सामाजिक कार्याची आठवण सर्वत्र केली जात आहे.