टारझन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; १२ मुलींची सुटका, २१ जणांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
भाईंदर : मिरारोड परिसरातील टारझन ऑर्केस्ट्रा बार वर बुधवारी रात्री उशिरा काशिमीरा पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत छुप्या खोलीतून ठेवलेल्या आणि अश्लील नृत्य करणाऱ्या १२ मुलींची सुटका करण्यात आली. तसेच बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहकांसह २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात डान्स बारवर बंदी असून केवळ महिला गायकांना गाण्याची परवानगी आहे. मात्र, ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अशा डान्स बारना गुपचूप चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत काशिमीरा परिसरात अशा बेकायदेशीर बारची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा बेकायदेशीर बारवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अलीकडच्या काही दिवसांत अनेक बारवर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.
मुलींची सुटका व ‘कॅविटी’चा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, टारझन बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य सादर केले जात असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करताना ग्राहक मुलींवर पैसे उधळताना आढळले. तपासणीदरम्यान १२ मुली सापडल्या, त्यापैकी ५ मुलींना लपवण्यासाठी बार मालकाने विशेष ‘कॅविटी’ म्हणजेच छुपी खोली उभारली होती. पोलिसांच्या तपासात याआधीही काही बार चालकांनी अशाच प्रकारे अनधिकृत बांधकाम करून मुलींना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवले आहे.
२१ जणांविरोधात गुन्हा दाखल
छाप्यातून बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहक मिळून एकूण २१ जणांविरुद्ध अश्लील नृत्य, बेकायदेशीर व्यवसाय आणि अनधिकृत बांधकाम यांसंबंधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.