गोल्ड लोन बँकेच्या फसवणुकीतून आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस अधीक्षक कार्यालयात खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
भंडारा – भंडाऱ्यातील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरने फसवणूक केल्याचा आरोप करीत एका इसमाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने तातडीच्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचले असून तो सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव अमित जोशी असे आहे. त्यांच्या मुलगा हिमांशू जोशीने महिनाभरापूर्वी भंडाऱ्यातील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेत तब्बल २९२ ग्रॅम सोनं गहाण ठेवून सुमारे १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जाची रक्कम बँकेचा स्थानिक मॅनेजर रोहित साहू याने फसवणूक करीत स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली आणि त्यानंतर तो भंडाऱ्यातून गायब झाला, असा गंभीर आरोप जोशी कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकाराची शंका आल्यानंतर अमित जोशी यांनी वारंवार बँक मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शंका अधिकच दृढ झाली. शेवटी १८ ऑगस्ट रोजी भंडारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून मॅनेजर रोहित साहू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिस तपास सुरू असतानाच जोशी यांना “विषप्राशन केल्यासच पैसे तातडीने मिळतील” असा सल्ला कोणीतरी दिल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेतली. आज दुपारी ते थेट भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात गेले आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित पोलिसांनी तत्काळ जोशी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली असून बँक मॅनेजर साहू याला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.