मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देहव्यापारावर छापा; मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका

Spread the love

मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देहव्यापारावर छापा; मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. मुंबई नाका परिसरातील मेट्रोझोन समोर “आरंभ स्पा” या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छाप्यात मसाज पार्लर चालवणारी महिला खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेण्यात आले. पीडित महिलांची चौकशी केली असता, त्यांना मसाज पार्लरच्या आडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलांमध्ये कानपूर, दिल्ली, मिझोराम, बिहार आणि नाशिक येथील महिलांचा समावेश आहे.

खुशबू सुराणा हिच्याविरोधात यापूर्वीही पिटा व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पीसीबी एमओबीच्या पथकाने सदर स्पावर छापा टाकला. या छाप्यात ५ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सपोनि विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे तसेच पोलिस अंमलदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लिला सुकटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे आणि दीपक पाटील यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. दरम्यान, शहरातील इतर स्पा सेंटर, मसाज पार्लरमध्ये पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. या पुढे देखील अशाच कारवाया सुरु राहणार, असा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon