सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई; खबऱ्याच्या टीप वरून कोट्यवधी रुपये किंमतीचा तब्बल ६०० किलो गांजा जप्त करण्यात यश
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापुर – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी गुरुवारी धाडसी कारवाई केली आहे . बार्शी पोलिसांच्या या कारवाईत कोट्यवधी रुपये किंमतीचा तब्बल ६०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बार्शीच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या टेम्पोमधून गांजाची तस्करी होणार आहे, अशी टीप खबऱ्याने पोलिसांना दिली होती. बार्शी पोलिसांनी खबऱ्याच्या एका टीपवर सापळा लावला. संशयास्पद टेम्पोची आणि लॉरीची तपासणी करत ६०० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अमली पदार्थाविरोधातील राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप ढेरे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू आहे. संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. गांजा तस्करीच्या नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपी ६०० किलो गांजा कुठे विक्री करणार होते, याचा तपास सुरू असून पोलिसांनी कोट्यवधी रुपये किंमतीचा गांजा आणि तीन वाहने जप्त केली आहेत.
बार्शी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. पोलिसांच्या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळातही अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सहाशे किलो गांजाची तस्करीचा भांडाफोड करताना बार्शी पोलिसांच्या शहर आणि ग्रामीण टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तसेच तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने ही कारवाई केली. स्थानिक पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला.