लोणावळ्यात भरदुपारी पर्यटक तरुणींची ‘फ्री-स्टाईल फाईट’; दारूच्या नशेत महामार्ग ठप्प!

Spread the love

लोणावळ्यात भरदुपारी पर्यटक तरुणींची ‘फ्री-स्टाईल फाईट’; दारूच्या नशेत महामार्ग ठप्प!

पोलीस महानगर नेटवर्क 

लोणावळा : पुणे-मुंबई महामार्गावरील पर्यटननगरी लोणावळा आज एका वेगळ्याच तमाश्याची साक्षीदार ठरली. सहसा डोंगररांगा, धबधबे आणि हिरवाईसाठी ओळखला जाणारा हा परिसर आज मात्र दारूच्या नशेत बेशिस्त वागणाऱ्या पर्यटक तरुणींच्या रस्त्यावरच्या भांडणामुळे गजबजला. भर दुपारी दोन तरुणींची अक्षरशः ‘फ्री-स्टाईल फाईट’ सुरू झाली आणि काही मिनिटांतच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ए-1 चिक्की दुकानासमोर दुपारी अचानक दोन पर्यटक तरुणींमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद चिघळताच त्या थेट रस्त्यावर एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागल्या. काही वेळातच हे भांडण ‘फ्री-स्टाईल फाईट’मध्ये बदलले. दारूच्या नशेत बेभान झालेल्या या तरुणी एकमेकींचे केस ओढून खेचत होत्या, तर इतर काही जण त्यांना थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.

या अनपेक्षित तमाशामुळे परिसरात पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. प्रचंड गाड्यांच्या हॉर्नांमुळे आणि तरुणींच्या आरडाओरड्यामुळे वातावरण गोंधळलेले होते. परिणामी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. लगेचच हाकेच्या अंतरावर असलेले लोणावळा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या तरुणी नशेत असल्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत भांडण चालूच ठेवत होत्या. अखेर महिला पोलिसांच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलिसांकडून संबंधित पर्यटक महिलांची चौकशी सुरू आहे. नक्की कशावरून हा वाद पेटला, याचा तपास सुरू असून त्यांना योग्य ती समुपदेशनाची आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने लोणावळ्यातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. पर्यटन स्थळांवरील सुरक्षेबाबत आणि पर्यटकांच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लोणावळ्यात पर्यटक तरुणींची दारूच्या नशेत महामार्गावरील ‘फ्री-स्टाईल फाईट’ हा प्रकार खळबळजनक ठरत असून, पर्यटक व्यवस्थापनासमोरील आव्हानं अधोरेखित करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon