राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले

Spread the love

राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही महिन्यांत सातत्याने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून आताही गेल्याच आठवड्यात ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निघाले होते. त्यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता, आणखी ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून योगेश कुंभेजकर यांना वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटीत कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, तुकाराम मुंढेंना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच आज आणखी ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यामध्ये, वाशिम, अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारीपदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुक्रमे योगेश कुंभेजकर, वर्षा मीना आणि संजय चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भुवनेश्वरी एस. नियुक्ती करण्यात आली. तसेच,रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१) योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२)रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती.

३)संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

४) भुवनेश्वरी एस.यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.आणि

५) वर्षा मीना यांची अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon