ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिन; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा प्रतिसाद
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत रविवारी (दि. १७ ऑगस्ट) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करून जागच्या जागी निपटारा करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमासाठी एकूण ६१४ अर्जदारांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ४३० अर्जदार प्रत्यक्ष हजर राहिले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
सदर तक्रार निवारण दिनात एकूण ३७३ अर्जांची तात्काळ निकाली काढणी करण्यात आली. उर्वरित अर्जदारांना देखील स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या शंका व तक्रारींचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे शहर पोलीसांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या ऐकल्या व त्यावर तत्काळ उपाययोजना केल्यामुळे अर्जदारांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी ठाणे पोलीसांचे विशेष आभार मानले.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी सांगितले की, “नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर आहेत. तक्रार निवारण दिन हा नागरिकाभिमुख पोलीसिंगचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”