आईच्या प्रियकराचा मुलाने केला खून; दौंड तालुक्यात धक्कादायक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : दौंड तालुक्यातील इंदिरानगर भागात आईच्या अनैतिक संबंधांमुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रविण दत्तात्रेय पवार (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. पवार यांचे एका विवाहितेशी अनैतिक संबंध होते. वारंवार सांगूनही हे संबंध न तोडल्यामुळे महिलेच्या मुलाला संताप आला. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा इंदिरानगर परिसरात पवार व अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला. वाद चिघळल्यावर मुलाने कोयत्याने पवारवर सपासप वार केले. डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीरावर वार झाल्याने पवार जागीच ठार झाला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.