स्वातंत्र्यदिनी पोलिसांचा माणुसकीशून्य चेहरा; जालना डीवायएसपीकडून उपोषणकर्त्याला ‘फिल्मी’ लाथ

Spread the love

स्वातंत्र्यदिनी पोलिसांचा माणुसकीशून्य चेहरा; जालना डीवायएसपीकडून उपोषणकर्त्याला ‘फिल्मी’ लाथ

पोलीस महानगर नेटवर्क

जालना – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पोलिसांचा माणुसकीशून्य चेहरा समोर आणणारी धक्कादायक घटना जालन्यात घडली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपोषणकर्त्याला जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक (डीवायएसपी) अनंत कुलकर्णी यांनी धावत जाऊन कमरेत ‘फिल्मी’ स्टाईलने लाथ घातल्याचा व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीने प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या महिनाभरापासून कौटुंबिक वादातून न्याय मिळवण्यासाठी अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना येथे आलेल्या पालकमंत्र्यांना आपली व्यथा सांगण्यासाठी ते ताफ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान, आंदोलकांपैकी एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताळण्याऐवजी, डीवायएसपी कुलकर्णी यांनी धावत जाऊन त्या आंदोलकाच्या कंबरेत जोरदार लाथ घालून त्याला खाली पाडले. हा प्रकार केवळ प्रत्यक्ष उपस्थित लोकांनीच नव्हे तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतही स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कायद्याचे पालन करणारे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी शपथ घेतलेले अधिकारी अशा प्रकारे वागणे हा स्वातंत्र्यदिनाच्या सन्मानालाही तडा देणारा प्रकार असल्याची टीका होत आहे.

कुसुमाग्रज आज असते तर स्वातंत्र्यदेवीला पुन्हा एकदा विनवणी करणारी कविता लिहिली असती, तर कवी नामदेव ढसाळ यांनी डीवायएसपी कुलकर्णींची तुलना जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांशी केली असती, अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon