१५ ऑगस्टच्या पहाटेपासून ते १८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना नो एंट्री
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्तेदुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात हाती घेण्यात आले असले, तरी त्यामध्ये आणखी सुधारणांची आवश्यकता असल्याने शुक्रवार १५ ऑगस्टच्या पहाटेपासून ते १८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत पुन्हा या मार्गावरील जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे-घोडबंदर रोड वरील गायमुख घाटातील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. आधीच हा रस्ता अरुंद असताना, त्यात खड्डे पडल्यामुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूककोंडीत भर पडली आहे. तासापेक्षा अधिक काळ या कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावरील दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कामाची पाहणी करून हा रस्ता चांगल्या प्रकारे खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे १५ ऑगस्टपासून या मार्गावर कामे सुरू होणार आहेत. येत्या काळात गणपती व इतर सणउत्सव असल्याने, मिरा-भाईंदर महापालिकेकडून या संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.