भिवंडीत भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या; घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोघा जणांची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. यापैकी प्रफुल्ल तांगडी असे मयत भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून दुसरा तरुण त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रफुल्ल तांगडी (४२) आणि तेजस तांगडी (२२)अशी हत्या झालेल्या युवकांची नावं आहेत. भिवंडीत तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथील तांगडीच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तांगडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसोबत जे डी टी इंटरप्रायसेस या आपल्या कार्यालयात बसला होता. यावेळी रात्री ११ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर दोघं भाऊ जमिनीवर कोसळले, त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याच्या खुनाने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपींमध्ये चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे.