व्यवसायिक सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार, व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीची कार्यवाहीचे आश्वासन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे पोलिसांनी शहरातील तसेच आसपासच्या व्यापारी वर्गाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी भारत मर्चंट्स चेंबरच्या ठाणे, बदलापूर, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर येथील सदस्यांसोबत विशेष बैठक घेऊन व्यावसायिक सुरक्षेचे मुद्दे, वाहतूक कोंडी आणि गुन्हे प्रतिबंध यावर सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या भागातील वाहतूक समस्यांमुळे होणाऱ्या अडचणी, चोरी, लूट आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली. या तक्रारींना गंभीरतेने घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
श्री. डुंबरे यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले की, “व्यापाऱ्यांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था ही आमची प्राथमिकता आहे. वाहतूक नियंत्रणासाठी अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात येईल तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.” यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीतून व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, व्यवसायिक वातावरण सुरक्षित आणि सुगम करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.