बेंचवर बसण्यावरून वाद; दोन अल्पवयीन मित्रांनीच केला मित्राचा खून!
सातपूरमधील खासगी क्लासमध्ये खळबळजनक प्रकार; मृत मुलगा दहावीत शिकत होता
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : सातपूर परिसरात एका खासगी क्लासमध्ये केवळ बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाने थरारक वळण घेतलं असून, दोन अल्पवयीन मित्रांनी मिळून आपल्या मित्राचीच बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. यशराज गांगुर्डे (वय १५, रा. सातपूर) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण सातपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दोन्ही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी यशराज आणि त्याचे दोन मित्र सातपूरमधील एका खासगी क्लासमध्ये शिकण्यासाठी आले होते. वर्गात बेंचवर कोण बसणार, यावरून त्यांच्यात वाद झाला. पहिल्यांदा हा वाद तिथेच थांबला, मात्र वर्ग संपल्यानंतर पुन्हा तिघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. क्लासच्या आवारातच दोघांनी मिळून यशराजला जोरदार मारहाण केली. लाथाबुक्क्या, चापट्या आणि हाताच्या आघातांनी झालेल्या मारहाणीत यशराज जागीच कोसळला. स्थानिकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. क्लासमधील इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन किशोर न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
सामाजिक प्रतिक्रिया
या प्रकारामुळे पालक आणि शिक्षक वर्गात चिंता वाढली आहे. मुलांमधील वाढते हिंसक वर्तन, रागावर ताबा नसणे आणि संवादाचा अभाव यामुळे ही गंभीर वेळ आली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळा व क्लासेसमध्ये मुलांमध्ये समुपदेशन व भावनिक मार्गदर्शन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ही घटना शिक्षणाच्या ठिकाणी घडल्याने ती अधिक चिंताजनक ठरत असून, पालक व समाजाने मिळून युवकांच्या मानसिकतेवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.