दादर कबुतरखान्यावरील पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक; मुंबईत शांतीदूत यात्रा काढून निषेध प्रदर्शन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरु केल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झाला आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात. त्यामुळे मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. याविरोधात रविवारी मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढून विरोध दर्शविण्यात आला. फक्त पशुपक्ष्यांना टार्गेट का केलं जातंय? कबूतर हानीकारक नाहीत… उलट चरस, गांजा, अफू यासारख्या गोष्टी आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहेत, त्या गोष्टी बंद करायला हव्यात. आधी आमचं विलेपार्ले मधलं मंदिर तोडलं, आणि आता कबूतरखान्यावर कारवा केली जात आहे. मुंबई महापालिकेचं हे धोरण आमच्यावर अन्यायकारक आहे, असा आरोप जैन समाजाच्या धर्मगुरुंनी केला. यावर आता महायुती सरकार आणि पोलीस काय भूमिका घेणार, हे बघावे लागेल.
शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे एक पथक दादर कबुतरखाना तोडण्यासाठी गेले होते. मात्र, त्याठिकाणी जैन समाजाच्या लोकांनी कारवाईला विरोध केला होता. याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा असूनही पालिकेला कबुतरखाना तोडता आला नव्हता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण दादरचा कबूतरखाना बंद केला होता. याठिकाणी धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे. दादरमधील कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्या आहेत. आता याठिकाणी कबुतरांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेला केवळ एक पिंजरा बाकी आहे. मात्र, आता उर्वरित कबुतरखान्याचे तोडकाम कधी केले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत शनिवारी माहीम पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. माहीमच्या एल जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अनोळखी कार चालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दादरमधील जैन समाजाकडून पालिकेच्या कारवाईला विरोध सुरुच आहे. कबुतरांमुळे कोणालाही काहीही त्रास होत नाही. या भागातील बिल्डर्सची घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.