साकीनाका पोलिसांची धडक कारवाई!

Spread the love

साकीनाका पोलिसांची धडक कारवाई!

पवईतील गुप्त गोडाऊनवर छापा; ४४ कोटींचा एम.डी. ड्रग्ज जप्त – मुंबईतील अंमली पदार्थ रॅकेटला जबर झटका

मुंबई – मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी अभियानात आणखी एक मोठं यश प्राप्त झालं आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पवईमधील प्रथमेश गॅलेक्सी इमारतीतील गुप्त गोडाऊनवर छापा टाकून २१.९०३ किलो मेफेड्रोन (एम.डी.) आणि त्यासाठी वापरली जाणारी रसायनं असा एकूण ₹४३.९७ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे मुंबईतील अंमली पदार्थांची एक मोठी साखळी उध्वस्त झाली असून, यामागे कार्यरत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या दिशेने पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

२४ एप्रिल २०२५ रोजी साकीनाका पोलिसांनी नशा विक्रीप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना पालघरमधील कामण गाव आणि कर्नाटकातील म्हैसूर येथून १९२.५३ किलो एम.डी. (₹३९० कोटी किंमत) जप्त करण्यात यश आलं होतं. त्यानंतर, म्हैसूर येथून अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, पोलिसांनी ३० जुलै २०२५ रोजी पवईच्या प्रथमेश गॅलेक्सी इमारतीत शॉप क्रमांक ९ वर छापा टाकला. संबंधित गोडाऊन रंगांच्या सामानामागे लपवले गेले होते.

या कारवाईत मेफेड्रोन (एम.डी.) २१.९०३ कि.ग्रा. ₹ ४३.८० कोटी, २-ब्रोमो ४ मिथाइल, प्रोपिओफेनॉन (रासायन) १५९ कि.ग्रा. ₹१५.९० लाख, मोनोमेथिलामाइन (रासायन) ३७६ कि.ग्रा. ₹५४ हजार, एकूण किंमत – ₹४३.९७ कोटी इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण तपासात आजवर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल: एम.डी. ड्रग्ज – २१४ किलो व एकूण अंदाजे किंमत – ₹४३४ कोटी

ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या सखोल आणि अचूक तपासाचे उत्तम उदाहरण आहे. मोठ्या प्रमाणात नशेचा साठा उघडकीस आणल्याने, मुंबईतील हजारो तरुणांच्या आयुष्याला अंधाराच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे व सुरक्षा) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) परमजितसिंह दहिया, डीसीपी (परिमंडळ १०) दत्ता नलावडे, सहा. पोलीस आयुक्त (साकीनाका) प्रदीप मैराळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय क्षीरसागर, सपोनि. दयानंद वणवे (मुख्य तपास अधिकारी), पोउनि. पंकज परदेशी, पो.ह. चंद्रकांत पवार, पो.ह. नितीन खैरमोडे (फिर्यादी) व पो.शि. अनिल करांडे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अंमली पदार्थ रॅकेटला जबर धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांची तत्परता आणि सक्रिय तपास यंत्रणा यामुळे अनेक कुटुंबांचं भविष्य अंधारात जाण्यापासून वाचलं आहे. हा प्रयत्न समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon