अखेर दया नायक यांना बढती, सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; पण केवळ २ दिवसांतच होणार निवृत्त

Spread the love

अखेर दया नायक यांना बढती, सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; पण केवळ २ दिवसांतच होणार निवृत्त

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक यांना अखेर सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी मिळाली आहे. ३१ जुलै २०२५ रोजी ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत. सध्या दया नायक हे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धाडसी ऑपरेशन्स पार पाडले असून, मुंबईतील अंडरवर्ल्डचा दबदबा कमी करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. दया नायक यांच्यावरील ही उशिरा का होईना मिळालेली बढती त्यांच्या सेवा कार्याची मान्यता मानली जात आहे. मात्र, निवृत्ती अगदी दारात असताना ही बढती दिल्याने पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या निर्णयावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

१९९० च्या दशकात मुंबई पोलीस दलातील “एन्काऊंटर स्पेशालिस्ट” म्हणून ओळख निर्माण करणारे दया नायक हे आजही अंडरवर्ल्ड विरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जातात. त्यांनी मुंबईत ८० पेक्षा जास्त कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले दया नायक कोकणी भाषिक कुटुंबातून आले. कन्नड माध्यमाच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर,१९७९ मध्ये ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. येथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करत असतानाच गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. प्लंबर अप्रेंटिस म्हणून काम करत असताना, त्यांचा संपर्क अंमली पदार्थविरोधी विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी आला आणि त्यातूनच पोलीस सेवेत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. अखेर, १९९५ मध्ये पोलीस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याच दरम्यान, मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव प्रचंड होता. डिसेंबर १९९६ मध्ये त्यांनी जुहूमधील एन्काऊंटरमध्ये छोटा राजनच्या दोन गुंडांचा खात्मा केला आणि यानंतर त्यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली.

प्रसिद्धीबरोबरच वादही त्यांच्या वाट्याला आले. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या आरोपांमुळे २००४ मध्ये त्यांच्यावर चौकशी सुरू झाली. मोक्का न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दया नायक यांची बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसीबीनं सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये मुंबईतील अंधेरीत व करकला (कर्नाटक) येथे त्यांच्या मालकीच्या दोन लक्झरी बसेसचा तपशील समोर आला. या प्रकरणात त्यांना अटकही झाली. या वादळातून सावरत २०१२ मध्ये त्यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. मात्र, २०१४ मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आजवर त्यांच्या नावे ८७ एन्काऊंटरची अधिकृत नोंद आहे. सध्या दया नायक गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक असून त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon