वसई-विरार महापालिकेच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निवास्थानासह ईडीचे १२ ठिकाणी छापे

Spread the love

वसई-विरार महापालिकेच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निवास्थानासह ईडीचे १२ ठिकाणी छापे

योगेश पांडे / वार्ताहत 

वसई – सक्तवसुली संचलालयाने वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी तेथील महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांच्या निवास्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे या अधिकाऱ्याच्या संबंधित ठिकाणांवर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वीही ईडीने याप्रकरणी १३ ठिकाणी छापे टाकून नऊ कोटी रोख रक्कम आणि २३ कोटी रुपये किंमतीच्या हिरेजडित दागिन्यांसह सोने आणि चांदी, तसेच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले होते. वसई-विरार परिसरात मंगळवारी पहाटेपासून छापे सुरू करून त्याबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे. एकाच वेळी १२ ठिकाणी शोध मोहीम सुरू असून त्यात वसई-विरार, मुंबई व नाशिक येथील ठिकाणांचा समावेश आहे. या अधिकाऱ्याच्या निवासस्थानीही शोध मोहीम राबविण्यात आली. वसई – विरारमधील बेकायदेशीर इमारतीप्रकरणी मुंबई ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने वसई – विरार परिसरात बेकायदेशीर राहिवासी व व्यावसायिक इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे. मीरा – भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात सुमारे ६० एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे ४१ राहिवासी व व्यावसायिक इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचे आरक्षण होते. पण आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले. त्यासाठी आरोपी बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री करण्यात आली. त्यामुळे अनेक गरीब व निरपराध नागरिकांची फसवणूक झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ईडीच्या तपासानुसार वसई – विरार या परिसरात २००९ पासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ईडीने या प्रकरणांमध्ये सखोल कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ईडीने कारवाई सुरू केली आहे. येथील ४१ बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. वसई – विरार महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक १५८५३/२०२२) कारवाई केली होती.

या तोडक कारवाईमुळे सुमारे २५०० कुटुंबे बेघर झाली आहेत. सध्या वसई – विरार महापालिका हद्दीतील १३ ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आचोळे पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणाचीही ईडी तपासणी करीत आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवकासह त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी ३० एकर खासगी जमीन, कचराभूमी व सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी राखीव असलेली आणखी ३० एकर जमीन बनावट मालकी हक्काची कागदपत्रे तयार करून विविध विकासकांना विकल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon