नागपुरातील बीअर बारमध्ये चक्क ‘शासन कारभार’!
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट घेत प्रशासकीय फायलींवर सह्या; व्हिडिओ व्हायरल
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपुरात एका बियर बारमध्ये चक्क शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मनीष नगर येथील एका बारमध्ये दुपारच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते आहे. त्यातील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओत दिसतोय. महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी नेमके कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क ‘शासन’ सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे. तर व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी ३.३० च्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आलेत. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा हि आणला होता. यावेळी त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा खोलून त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हि घटना घडल्याचे समजताच जर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रविवार दुपारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास, ‘हे’ अधिकारी कोण होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायर्लीवर सह्या केल्या, हे कळू शकेल. मात्र, हा प्रकार उघड झाला असताना प्रशासन किंवा पोलिस या प्रकरणात कितपत लक्ष घालणार आणि दोषींवर कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.