त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन पासेसचा काळाबाजार उघड; ५ जणांच्या टोळीला अटक, ऑनलाइन प्रणालीत त्रुटी
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – श्रावण मासाच्या सुरुवातीलाच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. ऑनलाईन माध्यमातून २०० रुपये किंमतीचे देणगी दर्शन पासेस काढून ते तब्बल ८०० ते १००० रुपयांत विकले जात होते. या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुप्त पाळत ठेवून कारवाई केली असून, या टोळीने बनावट नावे, आधारकार्ड आणि मोबाईल नंबर वापरून शेकडो पासेस बुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी ‘डायरेक्ट खटलं’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दररोजची तिकिट विक्री आणि वाटप यावर संवाद साधत होती.
ऑनलाइन पास विक्रीत गंभीर त्रुटी
देवस्थान ट्रस्टच्या वेबसाईटवरून सध्या २ हजार पास ऑनलाइन दिले जातात, तर उर्वरित ३ हजार पास मंदिर परिसरातून उत्तर दरवाज्याजवळून दिले जातात. मात्र ऑनलाइन प्रणालीत ओळखपत्राचे योग्य प्रमाणीकरण होत नसल्याने, बनावट माहितीवर पासेस मिळवणे शक्य झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी या त्रुटींची कबुली देत सांगितले की, “वेबसाईटमध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे गैरफायदा घेतला जात आहे. लवकरच वेबसाइटमध्ये तांत्रिक सुधारणा करून नवीन आणि सुरक्षित प्रणाली आणली जाणार आहे.”
यंत्रणांच्या नाकावर टिच्चून काळाबाजार!
मंदिर परिसरात नेहमीच सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात असताना देखील, इतका मोठा काळाबाजार सुरू होता, हे धक्कादायक आहे. पोलिसांना यामध्ये देवस्थान ट्रस्टमधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याचा संशय असून, तपास त्या दिशेने सुरू आहे.
फक्त काळाबाजार नाही, सुरक्षा धोक्यात!
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून, मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे मंदिरात कोणीही सहज प्रवेश करू शकतो, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.