खंडणी मागणाऱ्या माथाडी पदाधिकाऱ्याला ठाणे गुन्हे शाखेकडून रंगेहात अटक; ५ लाखांची खंडणी भोवली
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : माथाडी कामगार युनियनचा बनाव करून “प्रोटेक्शन मनी”च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या इसमाला ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या टोळक्यांवर मोठा आघात झाला आहे. तक्रारदार व्यवसायिकाच्या फिर्यादीनुसार, आरोपी घनश्याम सिताराम नाईक (वय ५२, रा. रोडपाली, कळंबोली, पनवेल) याने स्वत:ला माथाडी कामगार युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून, तक्रारदाराच्या मुंबई-ठाणे येथील साइटवर माल वाहून आणणाऱ्या प्रत्येक वाहनामागे दररोज ३,००० रुपये देण्याची मागणी केली होती. अन्यथा, काम बंद पाडण्याची आणि वाहने अडवण्याची धमकी त्याने दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याने ५ लाख रुपयांची खंडणी जुलमाने मागितली.
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, खंडणी विरोधी पथकाने योजनाबद्धपणे सापळा रचून दिनांक २२ जुलै २०२५ रोजी ठाण्यातील फॉरच्युन लेक सिटी हॉटेलजवळ, ज्युपीटर हॉस्पिटल परिसरात घनश्याम नाईक यास ५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८९/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२), ३५१(२), व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि भुषण कापडणीस करीत आहेत.
पोलीस तपासात आरोपीने याआधीही अशा प्रकारे इतरांकडून खंडणी वसूल केली असल्याचा संशय असून, कोणीही यासंदर्भात तक्रार द्यायची असल्यास सपोनि भुषण कापडणीस (मो. ८१०८०५१२०८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई डॉ. पंजाबराव उगले (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), श्री. अमरसिंह जाधव (पोलीस उप आयुक्त, गुन्हे), व श्री. विनय घोरपडे (सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-२) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि भुषण कापडणीस, पोउनि सुभाष तावडे, सपोउपनि संदीप भोसले, पोहवा संजय राठोड व पोशि तानाजी पाटील यांनी केली.