हायड्रा चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले, जागीच मृत्यु; पोलिसांनी हायड्रा ड्रायव्हरला घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात एका हायड्रा चालकाने ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले. या भीषण अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हायड्रा ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. गणेश पाटील असं या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असल्याची माहिती आहे. नवी मुंबईतील महापे परिसरात गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे रस्त्याच्या कडेला कर्तव्यावर तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाटील रस्त्याच्या कडेला उभे असताना यादरम्यान हायड्रा चालकाने वाहन उजव्या बाजूला वळवले. त्यावेळी कॉन्स्टेबल गणेश पाटील हे या वाहनाखाली आल्याने चिरडले गेले. याप्रकरणी चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, त्याने जेव्हा त्याचे वाहन वळवले तेव्हा कॉन्स्टेबल तिथे उभे असल्याचं त्याला दिसलंच नाही, जेव्हा त्याच्या ही घटना लक्षात आली होती, त्यापूर्वीच हा अपघात घडला होता.
या अपघातात गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल गणेश पाटील यांना तातडीने वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. डॉक्टरांनी गणेश पाटील यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतले असून घटनेची नोंद केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या संचालनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे कर्तव्यावर असताना हायड्रा चालकाने बाजूने येताना हलगर्जी करून गाडी चालवत पाटील यांच्या अंगावर नेली. चालकाला आम्ही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, आमचा सहकारी गमावल्याने दुःख असल्याचे सांगितले. याबाबत योग्य कारवाई करण्याचे काम सुरू आहे.