अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या आरोपात अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे काही धक्कादायक घटना घडत आहेत. अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात २१ वर्षाच्या महिलेने ही बलात्काराची तक्रार दाखल केली. महिलेने पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर आपण विष घेतल्याचे सांगितले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नगर शहरातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप लागल्यामुळे पक्षाचीही गोची झाल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय या प्रकरणात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद, भांडणं सुरू होत असे. या वादात मदत करण्याच्या निमित्ताने किरण काळे हे पीडित महिलेच्या संपर्कात आले. मदतीच्या आमिषातून काळे यांनी महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार, किरण काळे यांनी २०२३ ते २०२४ या दरम्यानच्या कालावधीत काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात अत्याचार केले. ही गोष्ट कोणाला कळली तरी जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच नगर शहरातील रस्ते विकास कामांमधील कथित गैरव्यवहारासंदर्भात किरण काळे यांनी माहिती उजेडात आणली होती. किरण काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महापालिकेतील ७७६ रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे ४०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले होते. त्यांनी सरकारी निधीच्या अपहाराबाबत ठोस पुरावे सादर करून सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. या घडामोडींमुळे काळे अचानक चर्चेत आले होते. त्यामुळे आता किरण काळे यांच्यावर झालेल्या कारवाईच्या टायमिंगची चर्चा शहरात रंगली आहे.काळे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी शहर पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली. किरण काळे यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी राठोड यांनी केली.