मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा ठाण्याच्या रायलादेवी तलावात बुडून मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – बुधवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावात एक दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ नगरमध्ये राहणारा २२ वर्षीय गुरुराज पेडामकर नावाचा तरुण तलावात बुडाला. तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तलावाला संरक्षक भिंत नसल्याने आणि सुरक्षारक्षक नसल्याने या घटना वारंवार घडतात, असे स्थानिक माजी नगरसेवकांनी सांगितले. गुरुराज पेडामकर मित्रांसोबत रायलादेवी तलावाजवळ गेला होता. तो पोहण्यासाठी तलावात उतरला. पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका मिनल संख्ये, वागळे पोलिस स्टेशनचे अधिकारी, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनी बचाव पथकाने गुरुराजचा मृतदेह बाहेर काढला.
ठाण्याच्या रायलादेवी परिसरात वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे नागरिक नाराज आहेत. प्रशासनाकडे सूचना केल्या आहेत. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसून भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशीही चर्चा केल्याचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले. त्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे याबाबत निवेदनही दिले आहे. रेपाळे यांनी सांगितले की, तलाव परिसरात विद्युत व्यवस्था नाही आणि पात्रात गाळ साचला आहे. त्यांनी संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्याची आणि संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. “तसेच ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह घटनास्थळाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या,” असेही ते म्हणाले. माजी नगरसेविका मिनल संख्ये यांनीही तलावाच्या दुरावस्थेची पाहणी केली.