जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; सत्तेच्या दडपशाहीचा आरोप; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Spread the love

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; सत्तेच्या दडपशाहीचा आरोप; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानभवनात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्यास विरोध करताना आव्हाड यांनी पोलिसांची जीप अडवली आणि थेट जीपसमोर झोपले होते. या प्रकारामुळे पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. ही कारवाई विधानभवनात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर करण्यात आली. विधानभवनाच्या लॉबीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की नितीन देशमुख यांच्यावर हातापायी झाली आणि त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला. घटनेनंतर विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टळला. या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

दरम्यान, रात्री उशिरा नितीन देशमुख याला पुढील चौकशीसाठी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेले जात असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची जीप अडवली. या कृतीमुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणं ही सत्तेची मस्ती आहे. मकोका आरोपीला विधानभवनात प्रवेश दिला जातो आणि आमदार सुरक्षित राहात नाहीत,” असे म्हणत त्यांनी भाजपवर थेट आरोप केला. त्यांनी पुढे असा दावाही केला की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडळकर यांनी इशारा करून देशमुख यांना मारण्यास सांगितल्याचं दिसतं. आव्हाड यांच्यावर हल्ला करायचा होता म्हणूनच गुंड विधानभवनात आणले गेले.”

वडेट्टीवारांनी याप्रकरणी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं, “ही दडपशाहीची लक्षणं आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना गप्प करण्याचा डाव रचला जात आहे. हे राज्य कायद्याचं राहिलं नाही, तर सत्तेच्या मर्जीने चालणारं राज्य बनलं आहे.” सध्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगली असून विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon