हनीट्रॅपचा भस्मासुर! राज्यातील ७२ वरिष्ठ अधिकारी आणि माजी मंत्री जाळ्यात?
राजकीय नेत्याचा गौप्यस्फोट; नाशिकसह मुंबई-पुण्यातील अनेक मोठी नावे संशयाच्या भोवऱ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि माजी मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याचा दावा एका प्रसिद्ध राजकीय नेत्याने केला आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या या नेत्याने पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात नाशिकमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे त्याने सूचित केले. तसेच यासंदर्भातील काही व्हिडिओ क्लिप्सही अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या क्लिप्स हनीट्रॅपचा भाग आहेत की केवळ खासगी रासलीला, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
राजकीय वर्तुळात खळबळ उडवत, संबंधित नेत्याने नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या प्रकार घडल्याची माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे, मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती, पण या प्रकरणात उच्चपदस्थ अधिकारी गुंतलेले असल्याने कोणीही पुढे येण्यास तयार नसल्यामुळे प्रकरण अद्याप गुप्तच आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाशिकसह मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना ही माहिती समोर आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कारवाई केली जाणार का? की हे प्रकरणही इतरांप्रमाणे दबून जाईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतील विश्वासार्हतेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
🟧 हनीट्रॅप म्हणजे काय?
हनीट्रॅप म्हणजे मोहात पाडून, सहसा लैंगिक किंवा भावनिक नात्यांच्या माध्यमातून, कोणाकडून गोपनीय माहिती मिळवणे किंवा ब्लॅकमेल करून फायदा घेणे. यामध्ये सोशल मिडिया, फेक ओळखी किंवा प्रत्यक्ष भेटींचा वापर केला जातो.