ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झालेल्या तरुणाने मलंगगडच्या कुशीवली गावात केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झालेल्या तरुणाने मलंगगडच्या कुशीवली गावात आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. कल्याण पूर्वेतील संतोष नगरमध्ये राहणाऱ्या किरण परब (२५) याने अंगावर पेट्रोल ओतून आपला जीव दिला. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याने आपल्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. किरण आगीत जळत असताना स्थानिकांनी तातडीने हिललाईन पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं, परंतु तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला. कल्याण पूर्वेतील संतोष नगरमध्ये राहणाऱ्या किरण परब या तरुणाने मलंगगडच्या कुशीवली गावात आपलं आयुष्य संपवलं आहे. त्याच्यावर खाजगी बँकेचे तीन लाख पन्नास हजारांचे कर्ज होते. तर आईच्या दागिन्यांवर देखील त्याने दिड लाखांचं कर्ज घेतलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला पेटवून घेताना त्याचा मोबाईल देखील जळाला असल्याची माहिती मिळाली आहे. हिललाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
किरण सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. त्याने सहा वाजण्याच्या सुमारास कुशिवली गावच्या धबधब्याच्या परिसरात जाऊन आपल्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून जीव दिला. आगीच्या ज्वाळा परिसरात दिसू लागल्याने तातडीने स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले आहे. किरणच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि बहीण आहे. वडील कृष्णा परब यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, किरणने स्वत:ला पेटवल्यानंतर त्याचा जळतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून सध्या प्रकाराचा तपास सुरु करण्यात आला असून शविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.