महिलेच्या फसवणुकीमुळे कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या; नाशिकमध्ये खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – महिलेशी फेसबुकवरून झालेली मैत्री आयुष्यातील मोठं संकट ठरल्याने एका कृषी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशांत पाटील (रा. नाशिक) असं आत्महत्या केलेल्या कृषी अधिकाऱ्याचं नाव असून ते जव्हार पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. फेसबुकवर झालेल्या ओळखीतून मैत्री वाढल्याने एका महिलेवर विश्वास ठेवून त्यांनी तब्बल ५५ लाख रुपये गुंतवले. मात्र, त्या महिलेने त्यांची मोठी फसवणूक केल्यानंतर आर्थिक व मानसिक तणावात येऊन त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
फेसबुक फ्रेंडने दिलं खोटं आमिष
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेने स्वस्तात तेल खरेदी करून महागात विक्री करून नफा मिळवण्याचं आमिष प्रशांत पाटील यांना दिलं होतं. या आमिषाला भुलून पाटील यांनी ३० तोळे सोनं विकून आणि कर्ज काढून पैसे उभारले. एकूण ५५ लाखांची रक्कम त्यांनी महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. मात्र, व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनंतर पाटील यांच्या पत्नीने नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून संबंधित महिलेचा शोध सुरू आहे.
अशाच स्वरूपाची दुसरी घटना मुंबईत
दरम्यान, अशाच स्वरूपाची दुसरी धक्कादायक घटना मुंबईत घडली होती. एका चार्टर्ड अकाउंटंट तरुणाची फेसबुकवरून एका तरुणीसोबत ओळख झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही आले. त्यानंतर त्या संबंधांचे व्हिडीओ काढून तरुणीने त्याला ब्लॅकमेल केलं. या ब्लॅकमेलच्या आधारे तब्बल ३ कोटी रुपये उकळल्यानंतर मानसिक त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर सावधगिरीची गरज
या दोन्ही घटनांमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या ओळखींचा आणि विश्वास ठेवण्याच्या निर्णयांचा गंभीर परिणाम कसा होऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.