बालिकेवर अमानुष मारहाणीचा प्रकार; व्हिडीओ व्हायरल होताच मुंब्रा पोलिसांची तत्काळ कारवाई
मुंब्रा – मुंब्रा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दिवा पोलीस चौकी हद्दीत एका चार वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या आईनेच स्टीलच्या मोठ्या चमच्याने अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिवा पूर्व येथील साबेगाव परिसरातील बी. आर. म्हात्रे बिल्डिंगमधील रूम नं. ०६ या ठिकाणी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी महिलेचे नाव यशोदा ब्रम्हया गुडीमेटा (वय २८ वर्षे) असून तिने तिची साडेचार वर्षांची मुलगी तन्वी हिला स्टीलच्या उलथन्याने निर्दयपणे मारहाण केली.
हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षदर्शी कु. दिया संजय देवेंद्र (वय १७) हिने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. सदर व्हिडीओ दोन पंचांच्या उपस्थितीत पाहून आणि ऐकून पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये जप्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बीट मार्शल क्र. ०४ तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडित बालिकेला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. तसेच फिर्यादी म्हणून श्रीमती जया गणेश गुडीमिटला (वय ५२) यांनी दिलेल्या जबाबावरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ११६०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१) तसेच बाल न्याय (मुलांचे संरक्षण व देखभाल) कायदा २०१५ मधील कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी व्हिडीओतील दृश्यांची शहानिशा करून व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून त्यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १८३ नुसार न्यायालयात साक्षीसाठी सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आईसारख्या व्यक्तीकडूनच आपल्या बालकावर होणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.