“…तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड!” सावकाराच्या अमानुष छळाला कंटाळून कापड व्यावसायिकाची आत्महत्या; चार पानी सुसाईड नोट, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बीड – बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी, काळजाला चिरत जाणारी घटना समोर आली आहे. सततच्या सावकारी जाचाला कंटाळून आणि त्याच सावकाराने पत्नी संदर्भात दिलेल्या अश्लील धमकीनंतर एका कापड व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. “…पैसे नाहीत तर बायकोला माझ्या घरी पाठव…” अशा अमानुष आणि अपमानास्पद धमकीने संतप्त झालेल्या राम फटाले (वय अंदाजे ४०) या व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना ६ जुलै रोजी बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत्यूपूर्वी राम यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून आपल्यावर झालेल्या मानसिक छळाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सावकार डॉ. लक्ष्मण जाधव, त्यांची पत्नी वर्षा जाधव यांच्यासह एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
सात वर्षांपूर्वी घेतलं होतं कर्ज, परतफेड करूनही छळ थांबला नाही
राम फटाले यांनी ७ वर्षांपूर्वी डॉ. लक्ष्मण जाधव यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांचं कर्ज १० टक्के व्याजदराने घेतलं होतं. त्यांनी दरमहा २५ हजार रुपये या हफ्त्याने परतफेड केली होती. मात्र संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही सावकाराचा छळ काही थांबला नाही. त्यांच्याकडे घेतलेल्या चेकचे व्यवहारही संपलेले असूनही ते चेक परत न करता मानसिक दबाव वाढवण्यात आला.
घाणेरड्या धमकीनंतरच गळफास
४ जुलै रोजी डॉ. जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा जाधव राम यांच्या घरी आले. पैशांबाबत दबाव टाकताना त्यांनी संतापजनक आणि अमानुष शब्दांत धमकी दिली – “पैसे वेळेवर देऊ शकत नाहीस, तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड!” या अपमानास्पद वक्तव्याचा खोल घाव राम यांच्या मनावर बसला. दोन दिवसांनी, ६ जुलै रोजी त्यांनी आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख
राम यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, सावकाराच्या सततच्या छळामुळे आणि अपमानकारक धमक्यांमुळे आपण आयुष्य संपवत असल्याचं नमूद आहे. या सुसाईड नोटवर राम आणि त्यांच्या वडिलांच्या सह्याही आहेत.
गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप
राम फटाले यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात डॉ. लक्ष्मण जाधव, वर्षा जाधव यांच्यासह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जण अटकेत असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी डॉ. लक्ष्मण जाधव हे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सावकारांचा जाच आणि राजकीय सत्तेचा वापर करून सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय हा पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आला आहे. पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यातून राम फटाले यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.