मालाडमध्ये परदेशी नागरिकाकडून २ कोटीं रुपये किंमतीचे कोकेन जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

Spread the love

मालाडमध्ये परदेशी नागरिकाकडून २ कोटीं रुपये किंमतीचे कोकेन जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

मुंबई – अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटच्या पथकाने मालाड पश्चिम येथील जे.पी. कॉलनी, ऑरलेम मार्वे रोड परिसरात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका परदेशी नागरिकावर कारवाई करत त्याच्याकडून २०० ग्रॅम कोकेन हा उच्च प्रतीचा अंमली पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे रु. २ कोटी असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी होंडा सिविक मोटारकार, तीन मोबाईल फोन जप्त केले असून, संबंधित परदेशी नागरिकाकडे वैध ओळखपत्रे अथवा व्हिसा नसल्याचे उघड झाले. याशिवाय, त्याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

कोकेन हा मानसिकतेवर गंभीर परिणाम करणारा उत्तेजक अंमली पदार्थ असून, त्याच्या सेवनामुळे मानसिक संतुलन ढासळू शकते. त्यामुळे, संबंधित परदेशी इसमावर एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५ आणि परदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सावंत आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपासही मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ.नि. प्रकाश सावंत करत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईने अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळ मिळाले असून, ‘अंमली पदार्थमुक्त समाज’ घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon