‘जय गुजरात’ म्हणणं मनसे कार्यकर्त्याला महागात; एकनाथ शिंदेंना डिवचल्यामुळे गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाची राजकीय पडसाद आता आणखी तीव्र होताना दिसत आहेत. या घोषणेवरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता रोहन पवार याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वप्निल एरंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोहन पवार याने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत ‘जय गुजरात’ असा उपरोधिक व आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. या पोस्टमुळे एकनाथ शिंदेंचा अवमान झाला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मनसे समर्थक आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अॅण्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरून ठाकरे गटासह अनेक विरोधकांनी त्यांच्यावर टोकाची टीका केली होती.
शिंदेंचं स्पष्टीकरण काय?
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “पुण्यातील गुजराती बांधवांनी एक भव्य कॉम्प्लेक्स उभारला आहे. भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ म्हणजे देशाचा अभिमान, ‘जय महाराष्ट्र’ म्हणजे राज्याचा अभिमान, आणि या कार्यक्रमाचे आयोजक गुजराती समाजाचे असल्याने ‘जय गुजरात’ म्हटलं, त्यात काहीही वावगं नाही.”
राजकीय तणाव वाढण्याची शक्यता
एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या पोस्टवरून थेट गुन्हा दाखल झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा, राजकीय टीकेची सहनशक्ती, आणि सोशल मीडियावरील वैचारिक मतप्रदर्शनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे या मुद्द्यावरून आणखी राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.