शीव पोलिसांची मोठी कारवाई; बनावट डॉक्टरकडून ६.३१ लाखांची औषध फसवणूक उघड
मुंबई : शीव पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने बनावट डॉक्टर बनून मेडिकल डिस्ट्रीब्युटरची फसवणूक करणाऱ्या हरियाणातील सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ६.३१ लाख रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात, एक बनावट डॉक्टर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलच्या नावाने संपर्क साधत फिर्यादी डिस्ट्रीब्युटरला हॉस्पिटलसाठी औषधांची मागणी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर ५.६६ लाख रुपये किमतीची औषधे घेऊन त्याच्या मोबदल्यात न वठणारे चेक देत फसवणूक करण्यात आली. शीव पोलिस ठाण्यात गु.र.क्र. १७९/२०२५ अन्वये भादंवि कलम ३१८(४), ३(५) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर तांत्रिक विश्लेषणातून आरोपी हरियाणाच्या रोहतक येथून मुंबईत येऊन फसवणूक करीत पुन्हा परत जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कामोठे, नवी मुंबई येथे सापळा रचून आरोपींना अटक केली.
मुख्य आरोपी मुकेश तलेजा याने पूर्वी एका मेडिकल कंपनीत नोकरी केली होती. तो इंडिया मार्टवरून डिस्ट्रीब्युटरचे नंबर गोळा करून स्वतःला डॉक्टर म्हणून भासवत होता. पोलिसांनी आरोपींकडून ५ मोबाईल फोन्स, १३ कोरे चेक व १ डेबिट कार्ड व ६.३१ लाख रुपये किमतीची औषधे जप्त केली. या आरोपींकडून अशाच प्रकारची इतर फसवणूकही उघड होण्याची शक्यता असून पोलिस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपरेक्षक विक्रम देशमाने, परिमंडळ ४ चे पोउपआ रागसुधा आर., सपोआ शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पो.नि. मनीषा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अविनाश जगताप, सायबर अधिकारी दत्तात्रय खाडे, पोलीस शिपाई कुंभार, पवार व तांत्रिक मदतनीस ठोके यांनी केली असून त्यांच्या जलद कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आला. शीव पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.