“धनुष्यबाण कोणाचा? शिंदे की ठाकरे? – १६ जुलैला सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी”
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पारंपरिक चिन्हावरून सुरू असलेली कायदेशीर लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत सुनावणीची मागणी केली असून, न्यायालयाने ही याचिका मंजूर करत १६ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी ठेवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आता निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा हवाला देत, चिन्हाच्या निर्णयाची तातडीने गरज असल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवरच सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी करण्यात आली.
शिंदे गटाचा विरोध
दुसरीकडे, शिंदे गटाने मात्र तातडीच्या सुनावणीला विरोध केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याचा मुद्दा मांडत, शिंदे गटाने या प्रकरणात तत्काळ सुनावणीची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
त्यावर सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने १६ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेचा मागोवा
२०२२: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत अनेक आमदारांना सोबत घेतले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
१७ फेब्रुवारी २०२३: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला.
यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, आणि चिन्हावर पुनर्विचाराची मागणी केली.
२०२५: प्रकरण अद्याप प्रलंबित असून आता १६ जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार.
राजकीय परिणाम
ही सुनावणी केवळ चिन्हापुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. चिन्ह कोणाच्या गटाकडे जातं, यावर दोन्ही गटांची ओळख, प्रचार आणि जनतेशी नातं टिकणार आहे. त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरू शकतो.