भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यातील भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गंभीर आरोप झाला असून, फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २३ जून) दुपारी १.३० च्या सुमारास पुण्याच्या कसबा पोलीस चौकी परिसरात घडली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौर्यानिमित्त शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच दरम्यान, काही भाजप पदाधिकारी चहाच्या टपरीवर थांबले होते. त्याच परिसरात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी प्रमोद कोंढरे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत ट्विटर (X) वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं,
> “प्रमोद विठ्ठल कोंढरे या भाजप पदाधिकाऱ्याने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे. त्याला तात्काळ पदावरून हटवण्यात आले असून आम्ही कठोरात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करू. भारतीय जनता पक्ष हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, आणि कोणत्याही प्रकारच्या अपमानास सहन केला जाणार नाही.”
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही अधिकृत प्रतिक्रिया देत सांगितले की,
> “प्रमोद कोंढरे यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ते पक्षपदावर राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही तो राजीनामा स्वीकारला आहे.”
सध्या पोलिस तपास सुरू असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील भाजप संघटनेला मोठा धक्का बसला आहे.