जालनामध्ये जादूटोणा, पैशांचा पाऊस आणि फसवणूक; निवृत्त शिक्षकाला ४६ लाखांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
जालना जिल्ह्यात एक धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. “एक लाखाचे एक कोटी करून देतो”, “पैशांचा पाऊस पाडतो” अशा आमिषांना भुलून एक निवृत्त शिक्षक ४६ लाख रुपयांनी गंडले. हा प्रकार जादूटोण्याच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी रतन लांडगे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची पद्धत:
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील निवृत्त शिक्षक रामेश्वर उबाळे हे जालना बसस्थानकावर एका अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आले. त्या व्यक्तीने उबाळे यांना रतन लांडगे यांच्याकडे नेले. रतन लांडगे याने “पैसे दुप्पट करून देतो” असा दावा करत एका विधीचे आयोजन केले आणि नकली पैशांचा पाऊस पाडल्याचा आभास निर्माण केला. उबाळे यांच्याकडून हळूहळू करून तब्बल ४६ लाख रुपये उकळण्यात आले.
त्यानंतर पूजा करताना अडथळा येत असल्याचे कारण देत विधी थांबवण्यात आला आणि पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. उबाळे यांनी पैसे मागितल्यावर आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर फसवणूक लक्षात आल्यानंतर उबाळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हेगाराची पार्श्वभूमी:
सदर आरोपी रतन लांडगे याला यापूर्वी देखील जालना तालुका पोलिसांनी जादूटोणाच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र सुटल्यावर तो पुन्हा त्याच फसवणुकीच्या मार्गावर परतला आणि आता पुन्हा एकदा त्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. सद्यस्थितीत तो जालना तालुका पोलिसांच्या ताब्यात असून सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत.