उसने घेतलेल्या पैशाचे व्याज वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; दोघांना अटक तर दोघेजण अद्याप फरार
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उसने घेतलेल्या पैशाचे व्याज वसूल करण्यासाठी एका तरुणाचं अपहरण केलं होतं. तसेच त्यांनी त्या मुलाच्या घरी फोन करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताचे आता पन्नास हजार रुपये टाका नसता तो तुम्हाला दिसणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळच्या साकूरमधून दोघांना अटक केली आहे. तर, दोघेजण अद्याप फरार आहेत. कृष्णा मैंद असं या अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. कृष्णाने धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आघाव या आरोपीकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. त्यावर रोज एक हजार रुपये असं व्याज त्यांनी लावलं होतं. त्याचे ८० हजार रुपये झाले होते. त्यानंतर या तिघांनी अन्य एका आरोपीच्या मदतीनं कृष्णाचं अपहरण केलं तसंच त्याला मारहाण केली.
कृष्णावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपींनी अशा पद्धतीने इतर काही गुन्हे केले आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.