पुण्याचा कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख पोलिसांच्या चकमकीत ठार
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका कुख्यात गुन्हेगाराचा खातमा केला. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय अंदाजे ३०, रा. गल्ली क्र. २३ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला.
१५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांचा आरोपी
शेखविरोधात हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, घरफोडी, दरोडा अशा स्वरूपाचे १५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती, मात्र तो काही काळापासून फरार होता.
नातेवाईकांकडे लपून बसलेला, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती
पुणे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेख सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेत होता. त्यानुसार पुणे क्राईम ब्रँच आणि मोहोळ पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शनिवारी रात्री कारवाई सुरू केली.
गोळीबार, पोलिसांचे प्रत्युत्तर, आरोपी ठार
पोलिसांनी घेराव घातल्यानंतर शेखने आपल्या पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित प्रत्युत्तर दिले आणि झालेल्या चकमकीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जिल्ह्यात खळबळ, नागरिकांत समाधान
या घटनेमुळे लांबोटी गावासह मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून पुढील तपास सुरु आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात पोलिसांनी उचललेले पाऊल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करत आहे.