वीज कडाडली नसती तर हत्येचा आरोपी सापडला नसता !

Spread the love

वीज कडाडली नसती तर हत्येचा आरोपी सापडला नसता !

पुण्यात लूटमारीच्या उद्देशाने महिलेची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पुणे पोलीसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – जोरदार पावसात आंबेगाव बुद्रुक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटवून मोठ्या शिताफीने भारती विद्यापीठ पोलिसांनी मारेकऱ्याला जेरबंद केले. आरोपीचा सुगावा लागत नसताना एकाएकी ‘सीसीटीव्ही फुटेज’ मध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशात संबंधित महिला रिक्षात बसल्याचे आढळले. हे दृश्य पाहून तपास करणाऱ्यांच्या डोक्यात वीज चमकली आणि त्यांनी या पुराव्यावरून अवघ्या २० दिवसांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. प्रिती वाखारे (३१) यांचा खून शाहरूख शकील मन्सूर (२७) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही घटना २० मे रोजी रात्री पावसात घडली. कात्रज ते नवले पूल रस्त्यालगतच्या पावसाळी नाल्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासण्यास सुरुवात केली. परिसरातील थोडथोडके नव्हे, तर ३२० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासण्यात आले. त्या वेळी एका कॅमेऱ्यात विजेच्या प्रकाशात महिला रिक्षात बसताना दिसली. दिसणारी रिक्षा अस्पष्ट होती; मात्र ती ‘टीव्हीएस’ कंपनीची असून, काळ्या रंगाचे हूड असल्याचे स्पष्ट झाले.

आरटीओ’कडून पुण्यातील १०,७९४ ‘टीव्हीएस’ कंपनीच्या रिक्षांची माहिती घेण्यात आली. त्यात वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावलेल्या १२०० रिक्षांची यादी समोर आली. त्यातील १५० रिक्षांचे ‘सीसीटीव्ही’ पुन्हा तपासले. त्यात आरोपीची रिक्षा निष्पन्न झाली. तपासादरम्यान, खून केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील अमखेरा (धामपूर) या गावात पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी ३२०० किलोमीटरचा प्रवास करून शाहरुखला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली,’ अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली. शाहरुखवर यापूर्वी लूटमारीचे चार आणि चोरीचा एक असे पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे आणि त्यांच्या पथकाने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon