भरधाव रिक्षा पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर – ठाण्यात रिक्षाचालकावर जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल

Spread the love

भरधाव रिक्षा पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर – ठाण्यात रिक्षाचालकावर जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – वाहतूक नियमन करत असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या अंगावर भरधाव रिक्षा घालण्याचा प्रकार ठाण्यातील मानपाडा परिसरात घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून रोजी रात्री ९:२० च्या सुमारास घडली. एम.जी. हेक्टर शोरूमजवळ, ठाणेहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना, श्री. पंकज नवनाथ शिरसाट, उपायुक्त (शहर वाहतूक शाखा, ठाणे) हे आपल्या कर्तव्यावर असताना रिक्षाचालकाने त्यांच्या अंगावर भरधाव रिक्षा घातली. या धक्कादायक प्रकारामुळे उपायुक्त शिरसाट गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर, फिर्यादी श्री. नयन संजय पांडव (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी हेमंत संतोष वर्मा (वय २७, व्यवसाय रिक्षाचालक) याने पोलीस अधिकाऱ्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक आणि बेदरकारपणे रिक्षा चालवत त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला.

पोलीसांनी तत्काळ कारवाई करत १२ जून रोजी रात्री १०:१५ वाजता आरोपीला अटक केली. या प्रकरणी आरोपीविरोधात भादवी २०२३ च्या कलम १०९, २८१, १२५(अ), १३५(ब), १३२ तसेच मोटार वाहन कायदा १८४, १७९, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे हे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon