पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून दर दिवशी नवी माहिती समोर येत असली तरीही निवडणूक नेमकी कधी पार पडणार याची मात्र अद्यापही स्पष्टोक्ती झालेली नाही. दरम्यान राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने नुकताच जाहीर केला. या कार्यक्रमानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आता महापालिका आणि नगरपालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता तुलनेनं कमी असून, त्या थेट नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभाग रचनेच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण ९ टप्प्यांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोगानुसार मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जाहीर होणार आहे. याच कालावधीत अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध केली जाणार आहे. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जाहीर केली जाईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना देखील राज्य निवडणूक आयुक्तांकडून २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतरचे टप्पे म्हणजे प्रथम, प्रभागांचे आरक्षण आणि त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या दोन्ही टप्प्यांसाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. परिणामी ही सर्व प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होऊन, त्यानंतरच निवडणुकीचं अंतिम वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नव्हे, तर थेट नोव्हेंबर किंवा हो गयाडिसेंबरमध्ये या बहुप्रतिक्षित निवडणुका होऊ शकतात. तेव्हा हा मुहूर्त तरी अंतिम राहतो की, त्यातही काही बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.