लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – लग्न पाहावे करुन’ असे म्हंटले जाते. अर्थात लग्न करण्यासाठी आणि ती जमवण्यासाठी जी खटपट करावी लागते त्यावरुन हे वाक्य प्रचलित झाले आहे. उपवर वयात लग्न न जमणे हा गेल्या काही वर्षांमधील मोठा प्रश्न बनला आहे. बीड जिल्ह्यातही हा प्रश्न गंभीर बनलाय. विधानसभा निवडणुकीत परळीमधील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु देतो,’ असं अजब आश्वासन दिलं होतं. देशमुख यांना हे आश्वासन का द्यावं लागलं? याचं धक्कादायक वास्तव बीड जिल्ह्यात उघड झालं आहे. बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली होती. यासाठी मुलाच्या कुटुंबाने मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना जवळपास पावणे सहा लाख रुपये देऊ केले. मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नाही. ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर आठवडाभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचे समोर आले. लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले. परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही खोट्या आश्वासनाला बळी न पडता खात्री करूनच लग्न जुळवावे असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.