ठाण्यातील देशद्रोही रवी वर्माने १४ पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरण ताजं असतनाच महाराष्ट्र एटीएसने गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. ठाण्यातील कळवा येथील रविकुमार वर्माचा असे आरोपीचे नाव आहे. तो नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो. त्याने भारतातील १४ पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पुरवली होती. आता ही माहिती कशा प्रकारे पुरवली याचा खुलासा झाला आहे. एटीएसने अटक केलेला रवी वर्मा पाकिस्तानच्या दोन फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावे आहेत. याच फेसबुक अकाऊंटवर रवी वर्माने तब्बल १४ सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाठवली. युद्धनौका तसेच इतर जहाजाची महत्त्वाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली होती. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी वर्मा तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा. त्यानंतर ती संपूर्ण माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवायचा. तो ही माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात समोर आले आहे.
रवी वर्मा नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवीय अशी मागणी रवी वर्माकडे होत होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता. यादरम्यान रवी वर्मा संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. एटीएसने काल कारवाई करून रविकुमारला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईने रविकुमारचं लग्न ठरवलं होतं. मात्र आता हेरगिरीच्या आरोपाखी एटीएसने त्याला अटक केल्यानंतर रविकुमारचं जिच्याशी लग्न ठरलं होतं, त्या कुटुबियांनी हे लग्न करण्यास नकार दिला आहे.