पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; सहकारनगर पोलीसांनी आरोपीला घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शंकर सर्जेराव धुमाळ (४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरामध्ये घुसण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करत होता. या प्रकरणी आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी शंकर धुमाळ हा व्यक्ती वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला आमदारांच्यावतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला अटक केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकर सर्जेराव धुमाळ (४७) या व्यक्तीस सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो वारंवार घराजवळ येऊन गोंधळ घालून शिव्या देत होता. हा प्रकार वारंवार घडत असल्याने अखेर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बुधवारी अटक केली. धनकवडी येथील आमदार तापकीर यांच्या निवासस्थानाजवळ शंकर धुमाळ वारंवार येऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी अजित देवघरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकीही दिली होती. या प्रकारामुळे आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तो पुन्हा पुन्हा येत राहिला. यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या निर्देशानुसार सहकारनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. शंकर धुमाळ याच्याविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ८५(१), भारतीय दंड संहिता कलम ३५२, ३५१(२)(३), १३२, ३३३ आणि पोलिस अधिनियम १९२२ अंतर्गत कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.